Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ४६

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ४६


गौरवीची लग्नाची पहिली रात्र…

खोलीत मंद उजेड होता… खिडकीतून चांदण्यांचा हलकासा प्रकाश आत शिरत होता…
आणि त्या प्रकाशात गौरवी शांतपणे पलंगाच्या कडेला बसली होती…
साडीच्या पदरचे काठाचे टोक  ती नकळत पिळत होती…
डोळ्यांत थोडीशी संकोचाची चमक… आणि मनात हजार प्रश्न होते…

माधव काहीही न बोलता तिच्या बाजूला येऊन बसला…
फक्त तिच्या उपस्थितीचा आधार देत…

“थकली असशील…”
तो हळूच म्हणाला…

गौरवी मान हलकेच हलवते…
“थकवा नाहीये… फक्त… इतक्या सगळ्या घडामोडीनंतर
आज पहिल्यांदाच मन थोडं स्थिर झालंय…”

माधव तिच्याकडे पाहतो…
त्या नजरेत अपेक्षा नव्हती… हक्क नव्हता… फक्त जपण्याची भावना होती…
तो तिचा हात अलगद आपल्या हातात घेतो…
त्या स्पर्शात कुठलाही उतावळेपणा नव्हता…
फक्त विश्वास होता…

“आज आपल्याला काहीच सिद्ध करायचं नाही…”
तो शांतपणे म्हणाला…
“फक्त एकमेकांच्या शेजारी असणं पुरेसं आहे…”

गौरवीच्या डोळ्यांत पाणी तरळतं… ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते…
त्या क्षणी ती पहिली रात्र कुठल्याही स्वप्नासारखी नव्हती…
ती होती... दोन जखमी मनांची शांत विश्रांती… दोन थरथरणाऱ्या जीवांचा आधार… आणि दोन अनिश्चित भविष्यांमधील पहिली सुरक्षित रात्र…

माधव हळूच तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवतो…
एक साधं… पण अर्थपूर्ण चुंबन…

त्या चुंबनात वचन होतं...
“मी आहे… आणि कायम राहीन…”

गौरवीच्या ओठांवर नकळत हसू उमटलं… आणि त्या रात्री
प्रेमापेक्षा मोठी गोष्ट दोघांमध्ये जन्माला आली… आणि ती म्हणजे 'विश्वास…'

खोलीत आता शांतता होती… ती दडपणाची नव्हती, तर आश्वासक होती…

माधव तिच्याजवळ बसलेलाच होता…
गौरवी अजूनही त्याच्या खांद्यावर विसावलेली होती…

तो हळूच तिच्या केसांमधून बोटं फिरवतो… जणू त्या विस्कळीत झालेल्या क्षणांना तो शांत करत होता…

गौरवीने डोळे मिटले… त्या स्पर्शात तिला पहिल्यांदाच सुरक्षित वाटलं…
“माधव…”
ती अगदी हलक्या आवाजात म्हणाली…

“हं…?”
तोही तितक्याच मृदू आवाजात…

“आजपर्यंत मला नेहमी स्वतःला सिद्ध करावं लागलं…
पण आज… मला काहीच सिद्ध करावं लागत नाहीये…”

माधव थोडा झुकतो… तिच्या चेहऱ्याकडे पाहत…
“कारण आजपासून तुझ्यावर विश्वास ठेवणारा एक माणूस कायम तुझ्या सोबत आहे…”
तो म्हणतो…

गौरवी त्याच्याकडे पाहते… त्या नजरेत लाज होती… कृतज्ञता होती… आणि थोडंसं प्रेमही…

तो तिची हनुवटी अलगद वर करतो… त्याचा स्पर्श प्रश्न विचारत होता… हुकूम देत नव्हता…

गौरवी नजरेतूनच होकार देते…

माधव हळूच तिच्या कपाळावर… मग गालावर…
आणि शेवटी ओठांच्या अगदी जवळ येऊन थांबतो…
त्या क्षणाचं मौनच सगळं बोलून जातं…

तो तिच्या ओठांवर फक्त एक क्षणभर
हलकेच चुंबन ठेवतो… कुठलीही घाई नाही… कुठलीही मागणी नाही…

गौरवीच्या श्वासांचा वेग थोडा वाढतो… ती लाजून पुन्हा त्याच्या छातीत शिरते… माधव हसत तिच्याभोवती हात गुंडाळतो… आणि तीला आपल्या मिठीत कैद करतो...

त्या मिठीत फक्त शरीर नाही तर आयुष्य सामावलेलं होतं…
त्या रात्री ते फक्त नवरा-बायको नव्हते…

ते होते... एकमेकांचा आधार… एकमेकांचं घर…
आणि एकमेकांची पहिली शांत, प्रेमळ सुरुवात…



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all